जळगाव मिरर | २ मार्च २०२५
डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी विमल मंगा शिरसाठ (वय ६१) या महिलेने पैसे सांभाळून ठेवले होते. त्या आठवजे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेल्या असतांना, चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. तेथून २५ हजारांची रोकड व अन्य साहित्य चोरुन नेल्याची घटना पिंप्राळ्यातील गणपती नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पिंप्राळा परिरातील गणपती नगरात विमल मंगा शिरसाठ या वास्तव्यास आहे. त्यांचे पती आरोग्य विभागात नोकरीला होते. २०१९ मध्ये त्यांचे निधन झाल्याने त्या एकट्याच राहतात आणि पेन्शनवर त्या उदरनिर्वाह करतात. तीन मुलापैकी दीपक व श्रावण मंगा शिरसाठ याच परिसरात विभक्त राहतात तर बन्सीलाल हा शिरपुर येथे राहतो. बुधवारी पिंप्राळ्याचा बाजार असल्याने सायंकाळी साडे सहा वाजता विमलबाई बाजारात गेल्या होत्या.
तेथून रात्री साडे आठ वाजता घरी आल्या असता घराच्या पुढच्या दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले होते तर फर्निचर केलेले कपाटही तुटलेले दिसले. कपाटातील पर्समध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ठेवलेले २५ हजार रुपये चोरुन नेले. तसेच घरातील अन्य साहित्यही अस्ताव्यस्त होते. पितळे पातेले, तांब्याची कळशीही गायब होती. हा प्रकार परिसरात राहणाऱ्या दोन्ही मुलांना सांगितला. त्यानंतर रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. हवालदार जितेंद्र राजपूत तपास करीत आहेत.
