जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२५
रावेर तालुक्यातील वाघोदा या मूळ गावी कुटुंबासह देवदर्शनासाठी गेलेल्या वृद्धाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २० डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिव कॉलनी येथील रहिवासी सुभाष रघुनाथ महाजन (वय ७२) हे २० डिसेंबर रोजी सकाळी कुटुंबासह वाघोदा येथे देवदर्शनासाठी गेले होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून रोख चार हजार रुपये तसेच सोने-चांदीचे दागिने व वस्तू असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
देवदर्शनावरून परतल्यानंतर घराचे कुलूप तोडलेले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सुभाष महाजन यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार २१ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत.




















