जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३
राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार अवकाळी पाऊस झालेल्या ठिकणी पाहणी करीत असतानाच आज देखील भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील काही जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस सुरु आहे. पुणे जिल्ह्यात हा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची माहिती मिळत आहे.या पावसामुळे अनेक शेतकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.
पुण्यातील कोथरूड मध्ये वारे व पावसामुळे दोन ठिकाणी फ्लेक्स व तीन ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. वाहतुक कोंडी होवून वाहनचालकांची तारांबळ उडाली. कोथरुड डेपो जवळ बसवर तसेच गुजरात काॅलनी चौकात फ्लेक्स पडला. शास्ञीनगर चौक येथे रिक्षावर झाड पडले. एआरए रस्त्यावर एक झाड पडले. कर्वेरस्त्यावरील सक्सेस स्क्वेअर सोसायटीमध्ये अर्धवट छाटणी झालेल्या फांद्या पडून वाहनांचे नुकसान झाले. वृक्ष प्राधिकरणच्या कामाबद्दल सोसायटीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. पौड रोडवरील आनंदनगर येथे पावसामुळे पाणी साठले होते.
कोथरूड बस डेपो येथे एका बसवर फलक पडला. त्यामुळे बसचे नुकसान झाले. तसेच, एरंडवणा येथील कलमाडी हाऊसजवळ एका इमारतीवर मोठा लोखंडी कॉलम पडण्याच्या स्थितीत होता. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचून अनुचित घटना होवू नये, यासाठी खबरदारी घेतली. तसेच, वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेली झाडे दूर करून वाहतुकीला मार्ग मोकळा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.




















