जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला नेत्या सुप्रिया सुळे हे गेल्या तीन ते चार दिवसापासून विदर्भ दौऱ्यावर असतांना आज अमरावतीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस व पवार सरकारवर ताशेरे ओढले आहे. त्यांनी थेट हे खुनी सरकार असल्याची देखील टीका यावेळी केली आहे. सध्याच्या सरकारचा कारभार आपण सर्व जण पाहत आहात. ज्या पद्धतीने या लोकांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी रोष आहे, असेही त्या म्हणाल्या.
सुळे पुढे म्हणाले कि, आयकर, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून कोविड काळात चांगली कामगिरी करणारे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले आहे. साम, दाम, दंड, भेद हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द अजूनही मला आठवतात. काहीही करा, पण जिंका, असे ते म्हणतात. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात कुठली चांगली कामे झालीत, हे आपल्याला कुणीतरी सांगा.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूंना पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण २५ हून अधिक लोक दगावले आहेत आणि त्यात १२ लहान मुले आहेत. या मुलांच्या आईला काय उत्तर देणार तुम्ही. ठाण्यात देखील असेच प्रकरण उघडकीस आले होते. आता नांदेडमध्ये मृत्यू झाले आहेत. इतर ठिकाणाहून देखील अशा बातम्या येताहेत, हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. या सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.