जळगाव मिरर | ११ जून २०२५
राज्याच्या राजकारणात महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदावरून बाजूला होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “दिवा विझताना मोठा होतो, तशीच सध्या जयंत पाटलांची अवस्था आहे”, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत पडळकर बोलत होते.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची गोष्ट मला सिरीयस वाटत नाही. ते जबाबदारीपासून का पळ काढत आहेत हे मला माहिती नाही. जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय आहे. सतत जाळ घालून मोठा करण्याचा प्रयत्न केला तरी काय उपयोग होणार नाही. दिवा विझताना मोठा होतो, तशी अवस्था जयंत पाटील यांची झालेली आहे.
“जयंत पाटील यांचं राजकारण आता संपुष्टात आलं आहे. ते कुठलाही संघर्ष न करता केवळ अनुकंपेवर राजकारणात आले. सांगलीसाठी त्यांनी कोणताही ठोस प्रकल्प आणलेला नाही. ते केवळ व्हीआयपी कॅबिनेट मंत्री राहिले. आता त्यांच्या टायरचं पंक्चर नाही, तर तो फुटलाय, त्यामुळे पूर्ण बदल आवश्यक आहे,” असं उपहासात्मक वक्तव्यही पडळकरांनी केलं.
रायगडावरील धनगर समाजाच्या घरांवरूनही पडळकरांनी सरकारला खडसावलं. “स्वराज्यात धनगर समाजाचा मोठा वाटा होता. रायगडावर त्यांची जबाबदारीही मोठी होती. आता त्याच समाजाला रायगडावरून हुसकावलं जात आहे. पुरातत्व खात्याने दिलेल्या नोटीसा फाडून टाका,” असा आक्रमक इशारा देत त्यांनी लवकरच रायगडावर जाणार असल्याचं जाहीर केलं.
