
जळगाव मिरर | २ मार्च २०२६
कल्याण शहरात काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अखेर शोध लागला असून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुरुवातीला एका मुस्लिम तरुणावर अपहरणाचा संशय व्यक्त करत ‘लव्ह जिहाद’ची चर्चा रंगली होती; मात्र पोलिस तपासात हे दावे निराधार ठरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी घरातील दागिने घेऊन अचानक बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही मुली न सापडल्याने पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला. सुरुवातीच्या काही माहितीच्या आधारे हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’शी संबंधित असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र तपासाची दिशा बदलत गेली आणि दोन्ही मुली आपल्या मित्रांच्या घरी सुरक्षित असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दोघींनीही धक्कादायक खुलासा केला. सावत्र आई आणि वडील सातत्याने मारहाण करतात तसेच शिक्षण घेऊ देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. घरातील सततच्या त्रासाला कंटाळून आम्ही स्वतःहून घर सोडल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’सारखा कोणताही प्रकार नसल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
तसेच आम्हाला आई-वडिलांसोबत राहायचे नाही, असा निर्णयही त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केला आहे. मुलींच्या या भूमिकेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बालकल्याण समितीकडे प्रकरण पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र पोलिस तपासानंतर समोर आलेल्या सत्यामुळे अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.




















