
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२४
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक केली. विकी साहेब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी त्यांची नावे असून ते बिहारचे रहिवासी आहेत. त्यांना आज मुंबईत आणण्यात येणार आहे.
14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी 4 राऊंड फायर केले. गोळीबाराच्या वेळी सलमान घरातच होता. या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती. खानला लॉरेन्स-गोल्डी ब्रार टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
ज्या बंदुकीने गोळीबार करण्यात आला ती 7.6 बोअरची बंदूक असल्याचे मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले. घटनास्थळावरून फॉरेन्सिक तज्ज्ञांना जिवंत गोळी सापडली आहे. पोलिसांनी आरोपीची दुचाकीही जप्त केली आहे. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स ग्रुपने घेतली आहे. ग्रुप सदस्य अनमोलने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, भविष्यातही सलमानवर हल्ला होऊ शकतो. मात्र, या पोस्टला पोलिसांनी दुजोरा दिला नाही.