जळगाव मिरर । १८ ऑक्टोबर २०२५
जगातील अफगाणिस्तानच्या क्रीडा विश्वाला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना पक्तिका प्रांतात घडली आहे. पाकिस्तान सीमेजवळ केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार झाले आहेत. या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने पुढील महिन्यात पाकिस्तान व श्रीलंका यांच्याविरुद्ध होणाऱ्या त्रि-देशीय मालिकेतून माघार घेतली आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. शुक्रवारी दोन्ही देशांनी ४८ तासांच्या युद्धबंदीला मुदतवाढ देण्याचे मान्य केले. मात्र, काही तासांनंतरच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये तीन अफगाण क्रिकेटपटूही मारले गेले.
कबीर, सिबगतुल्ला आणि हारून हे तीन खेळाडू पाक्तिका प्रांतातील उरगुन येथून पूर्व पक्तिका प्रांतातील शराणा येथे मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी गेले होते. सामना आटोपून ते परत गावात पोहोचताच एका कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात खेळाडूंसह एकूण आठ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. अफगाणिस्तानने याला “पाकिस्तानचा भ्याड हल्ला” असे म्हटले आहे.
या घटनेनंतर, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी त्रिकोणीय टी-२० मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचाही समावेश होता. ही मालिका नोव्हेंबरच्या अखेरीस खेळवण्यात येणार होती.
अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान याने सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया देत म्हटले, “पाकिस्तानी हवाई हल्ल्यात नागरीकांचा आणि क्रिकेटचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायक आहे. नागरीकांवर हल्ला करणे हे अमानुष आणि निर्दयी कृत्य आहे. आपल्या राष्ट्रीय सन्मानापेक्षा काहीही मोठे नाही; म्हणूनच एसीबीच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो.”