जळगाव मिरर | १३ मार्च २०२४
रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला दुचाकीस्वार दोन पुरुषांसह एका महिलेने पैशांची मागणी केली. परंतु त्या तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याने, तरुणाला मारहाण करीत त्याच्या मोबाईल जबरीने हिसकावून नेल्याची घटना रविवार घडली होती. जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासात तिघांच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडीरोड परिसरात अक्षय विलास शेलार (वय २८) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवार दि. १० मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे कामानिमित्त आलेला होता. तो पायी जात असतांना मागून दुचाकीवर आलेले अज्ञात दोन पुरूष आणि एक महिलेने त्याला थांबवीत काही मदत हवी का असे विचारले. तरुणाने मदत नको असे म्हणत तो तेथून निघून गेला. परंतु दुचाकीस्वारांनी त्याला पुन्हा थांबवित त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याने दुचाकीस्वार महिलेने तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच काही कळण्याच्या आत त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून ते तेथून अग्रवाल चौकाकडे पळून गेले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला दिल्या. त्यानुसार गुन्हा शोध पथकातील जुबेर तडवी व अमित मराठे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांच्या पथकाने संशयित शेख अजरुद्दीन शेख हुस्नोद्दीन उर्फ भुतपलीत (वय ३२, रा. शाहुनगर), मंगल सोमा सोनवणे (वय २८, रा. पिंप्राळा हुडको) व जया जुलाल जाधव (वय २८, रा. सिद्धार्थ नगर, पिंप्राळा हुडको) या संशयितांना २४ तासात अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ सलिम तडवी, पोना जुबेर तडवी, पोकों अमितकुमार मराठे, मिलींद सोनवणे, तुषार पाटील, महिला पोलीस कर्मचारी वैशाली सादरे, चालक पोहेकॉ साहेबराव खैरनार यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चव्हाटे हे करीत आहे.