जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२५
पपईच्या व्यापारासाठी भुसावळहून यावलकडे दुचाकीने निघालेल्या तिघा व्यापाऱ्यांचा रविवारी (३ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निमगावजवळ भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत तिघेही व्यापारी गंभीर जखमी झाले.
या दुर्घटनेत इरफान मुस्ताक बागवान (वय अंदाजे ४५) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, दोन व्यापारी उपचार घेत आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत तिघांनाही रुग्णालयात हलवले. मात्र, इरफान बागवान यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. ते जळगाव खुर्द येथील नॅशनल हायवे क्रमांक ५३ लगतच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. सईद शकील बागवान (वय अंदाजे ४९) किरकोळ जखमी, भुसावळ प्रांत कार्यालयाजवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. दानिश फकीर मोहम्मद बागवान (वय अंदाजे २५) गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना घडली तेव्हा तिघेही एकाच दुचाकीवरून यावलच्या दिशेने जात होते. निमगावजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे तिघेही रस्त्यावर दूरपर्यंत फेकले गेले. प्रत्यक्षदर्शीनी तात्काळ मदत केली. तीघेही व्यापारी भुसावळ शहरातील जाम मोहल्ला, बाबला हॉटेलजवळील परिसरात राहणारे असून, पपईच्या व्यापाराशी संबंधित आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला आहे. संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
