भुसावळ : प्रतिनिधी
शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना पोलीस यंत्रणा त्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहे. गुरुवारी पहाटे तीन मोटारसायकल अज्ञात इसमांनी जाळून टाकल्या तर घरासमोरील मोटारसायकल ट्रॅक्टर व डंपरच्या आहे. बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोटारसायकल चोरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत आहेत. त्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळणार की फक्त घटनेची नोंद होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
शहरातील व्यापारी दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी आपले लक्ष्य आता घर, मोटारसायकल, वाहनांच्या बॅटऱ्यांवर केंद्रित केलेले दिसत आहे. दुकानांच्या चोरीमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दिसलेला आहे. मात्र त्याला अद्यापही पकडण्यात यश आलेले नाही. हा प्रकार उघडकीस येत नाही तोच गुरुवारी पहाटे दीड ते तीन वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील दत्तनगरात अप्पा फुलचंद सावळे हे पत्नी, दोन मुलांसह राहतात. वडील, मुले हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मुले शिक्षणासोबत इतर कामकाजही करतात त्यासाठी प्रत्येकाची स्वतंत्र अशी मोटारसायकल सावळे यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या एम.एच. १९ डी.पी. ६२११, एम.एच. १९. डी. टी. ६८६४ व एम. एच. १९ ए. एस. ९३०१ या क्रमांकाच्या तीन मोटारसायकल गुरुवारी पहाटे कोणी तरी अज्ञाताने पेटवून दिल्या. अप्पा सावळे यांना जाग आली तेव्हा त्यांनी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना उठविले. पण तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.
गुरुवारी दुपारी सावळे यांनी बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेजस पारीस्कर करीत आहे.
चोरते सिसिटीव्हीत कैद
जामनेर रोडवरील नहाटा कॉलेजजवळ असलेल्या एसटी मार्बल येथून सीताराम नथुराम सैनी यांच्या मालकीची एम. एच. १९ ए.यू. १५०६ क्रमांकाची मोटारसायकल त्यांच्या कंपाउंडमधून दोन चोरट्यांनी लंपास केली. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्हीमध्ये मोटारसायकल चोरताना कैद झाले आहेत.
या विभागाचे नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या महेशनगर बर्फाच्या कारखान्यातील ट्रॅक्टरची बॅटरी, अमीन शेख यांच्याही ट्रॅक्टरची बॅटरी व मयूर नागोरी यांच्या मालकीच्या डंपरमधून दोन बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर (पिंटू ठाकूर) सैनी, अमीन शेख यांनी बाजारपेठ पोलिसांत निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेतली व सर्व प्रकार सांगितला.