अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील एका गावात एकाने महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करीत हातावर वार करून तीन बोटे तोडल्याची धक्कादायक घटना दि.२१ रोजी सकाळी ९ वाजेच्या जानवे गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ३० वर्षीय महिला सुनीता प्रदीप भिल हे आपल्या पतीसह जानवे येथे नातेवाईकांकडे आली होती. २१ रोजी सकाळी ती जानवे येथे पतीसोबत शेतात कामाला गेली. एकाने तिच्या डोक्यावर ‘धाऱ्या’ने तीन वार केले. तसेच तिच्या हातावर वार करून डाव्या हाताचा अंगठा तोडला व उजव्या हाताची दोन बोटे तोडली. साधारणतः दहा वाजेच्या सुमारास शेतातून महिला घरी परतल्यावर ही बाब उघडकीस आली.
जखमी सुनीताला जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ मयुरी महाजन यांनी प्रथमोपचार केले. मात्र सुनिताची प्रकृती गंभीर असल्याने तिला धुळे येथे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. तिच्या डोक्याला ३५ टाके पडले आहेत. सुनिताच्या डोक्यावर तिच्या पतीनेच वार केल्याचे समजते. तिचा पती फरार झाला आहे. सुनीता जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने सकाळी धुळे पोलीस तिचा जबाब घेणार आहेत.