अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील करणखेडे येथे गॅस लिक झाल्याने तीन घरांना आग लागून दोन कुटुंबे बेघर झाली. सुमारे तेरा लाखांचे नुकसान झाल्याची घटना, १० रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. उद्ध्वस्त कुटुंबांनी नातेवाइकांकडे आसरा घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बापू राजधर धनगर यांच्या पत्नी सकाळी १०:३० वाजता स्वयंपाक करत असताना गॅस पेटवताच अचानक आग लागली. त्या ओरडत घराबाहेर पडल्या. आजूबाजूचे नागरिक धावत आले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण घराने पेट घेतला होता. ग्रामस्थ हातात हंडे, बादल्या घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते मात्र आग आटोक्यात येत नव्हती. घराला लाकडी छत असल्याने लवकर पेट घेतला.
काही ग्रामस्थांनी शेजारील घरांना आग लागू नये म्हणून धाब्यावर जाऊन खोदण्यास सुरुवात केली. तोपर्यंत आसाराम राजधर धनगर यांच्याही घराला आग लागली. बाजूच्या सुनील आत्मराम गुरव यांच्याही घराला आग लागली. शरद धनगर यांनी ताबडतोब न.प.ला फोन करून आगीचे वृत्त कळवताच मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन बंब करणखेडा येथे पाठवला. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिन्हाडे, वाहन चालक फारुख शेख, फायरमन मच्छिंद्र चौधरी, वासिम पठाण यांनी आग विझविली.