जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
जळगाव शहरातील एका परिसरात दरवाजाला लाथा मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी दाम्पत्यासह एकाला बेदम मारहाण केली. ही घटना दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास खंडेराव नगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खंडेराव नगरात योगेश हरीलाल सोनार हे वास्तव्यास असून दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा वैभव अशोक वडतकर हा दारुच्या नशेत त्यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमानास वैभव वडतकर हा दोन अनोखळी इसमांसह वैभव सोनार यांच्या घरी येवून त्यांना शिवीगाळ करीत होते. यावेळी त्याने काल रात्री तुम्ही माझ्याशी का भांडण केले, आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्यांनी दाम्पत्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी वैभव सोनार यांचा भाऊ राहुल सोनार हा त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आला असता, वैभव वडतकर याने त्याठिकाणी पडलेला दगड दोघांच्या डोक्यात टाकून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर ते तिघेही मारेकरी तेथून पसार झाले.
वैभव सोनार हे तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलिसात आले असता, त्यांना पोलिसांनी मेडीकल मेमो देवून उपचारासाठी रवाना केले. त्यांनी उपचार घेतल्यानंतर वैभव सोनार यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.