जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
राज्यातील अनेक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असतांना नुकतेच नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे भरदिवसा पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवन धीरज हिरणवार (रा. काचीपुरा, नागपूर) असे मृताचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पवन हिरणवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पवन हा त्याच्या दोन मित्रांसह खापरखेडा येथील बाभूळखेडा संकुलातून कारने जात होता. दरम्यान, मागून तीन दुचाकींवरील पाच ते सहा जण आले आणि त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात पवनचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले.
गोळीबाराचा आवाज ऐकताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कुख्यात शेखूच्या भावाच्या हत्येप्रकरणी पवन हिरनवार हा आरोपी होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचे बोलले जाते.