जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
अपघातानंतर अंधारात वाहनातून उतरत असताना रस्त्यालगतच्या शेतातील विहिरीत पडल्याने निंभोरा बुद्रुक येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २८ रोजी रात्री दसनूर फाट्याजवळ घडली. या अपघातात मृत तरुणाचे पाच मित्र किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे निंभोरा व परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात दीपक विलास चौधरी (पाटील, वय १९, रा. निंभोरा बुद्रुक) याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक चौधरी हा आपल्या मित्रांसोबत सावदा येथे जेवण करून चारचाकी डस्टर (क्रमांक एमएच-१३ बीएन-९०९१) या वाहनाने निंभोऱ्याकडे परत येत होता. सदर वाहन संस्कार प्रकाश चौधरी (रा. निंभोरा बु.) चालवत होता. वाघोदा–निंभोरा रस्त्यावरील दसनूर फाट्याजवळ दि. २८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले.
अपघातानंतर वाहनातून बाहेर पडताना अंधारात दीपक चौधरी याचा रस्त्यालगतच्या शेतातील विहिरीत पडल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक संस्कार चौधरी याच्यासह कुणाल शरद बारबंद, शुभम दत्तू दोडके, नितीन अरुण चौधरी व गणेश अशोक कुंभार हे पाच मित्र किरकोळ जखमी झाले आहेत.
या प्रकरणी नथ्थू रामभाऊ चौधरी (पाटील) यांनी दिलेल्या माहितीनुसार निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ममता तडवी, हे.कॉ. अविनाश पाटील, योगेश चौधरी, किरण जाधव, परेश सोनवणे व महेंद्र महाजन करीत आहेत. या दुर्दैवी घटनेत तरुण दीपक चौधरी यांचा मृत्यू झाल्याने निंभोरा बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




















