जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२५
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वरखेड शिवारात सोमवारी भीषण अपघातात आई-वडिलांसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आठ वाजेदरम्यान ही घटना घडली.
यात सजन राजू राजपूत (२८), शीतल सजन राजपूत (२५) आणि कृष्णांश (१ वर्ष, सर्व रा. सटाणा, ह.मु. वाळूज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. सजन राजपूत हे दुचाकीने वाळूज येथून आपल्या गावी सटाणा येथे गेले होते. परतीच्या प्रवासात गंगापूर- वैजापूर महामार्गाने ते वाळूजकडे येत होते. दरम्यान, वरखेड शिवारात भरधाव स्कॉर्पिओ कारने राजपूत यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सजन राजपूत यांच्यासह पत्नी शीतल आणि मुलगा कृष्णांश हे शेतात जाऊन पडले, तर दुचाकीचा चुराडा झाला. तथापि, अपघातात राजपूत कुटुंबीय जागीच गतप्राण झाले.
अपघातस्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. उपस्थितांनी जखमींना तत्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या तिघांनाही मृत घोषित केले.