जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२५
राज्यात अपघाताच्या मालिका सातत्याने सुरु असतांना आता हिंगोलीमध्ये हळद कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून तिघे बचावले आहेत. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली. ट्रॅक्टर कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या. हिंगोलीतील गुंज गावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडला. पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून आमदार राजेश नवघरे हेदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत महसूल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला व पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव (जि.नांदेड) शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. या मजुरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे. यातील 2 महिला आणि एक पुरुष है सुदैवाने बचावले. दरम्यान, विहीर पाण्याने भरली असल्यामुळे आत ट्रॅक्टर व ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत आहे. विहिरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे.