
कोर्ट चौक ते स्टेडियम चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू; दुसऱ्या रस्त्यावर खाजगी बांधकामामुळे वाहतुकीला अडथळा
जळगाव मिरर | २ मार्च २०२६
जळगाव शहरातील कोर्ट चौक ते स्टेडियम चौकापर्यंत असलेल्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण काम सुरू असल्यामुळे हा मार्ग वाहनधारकांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. मात्र या परिस्थितीत दुसऱ्या रस्त्यावरून वाहतूक सुलभ व्हावी यासाठी अनेक वाहनधारक भाजप कार्यालयाच्या बाजूने जाण्याचा मार्ग निवडत आहेत.
अत्यंत गंभीर बाब म्हणजे, या रस्त्यावर एका खाजगी बांधकामामुळे रस्त्याच्या मध्यभागी वाळू टाकण्यात आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परिणामी, अगोदरच एकच मुख्य रस्ता सुरु असताना, हा पर्यायी मार्गही बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेषतः स्टेडियम चौकाकडून कोर्ट चौकाकडे जाताना वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
महानगरपालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित झाला आहे की, खाजगी बांधकामासाठी रस्ता बंद केल्याबाबत कोणती कारवाई झाली आहे की नाही, आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीचे उपाय योजले जातील की नाही. या घटनेमुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम झाला असून, शहरातील वाहतुकीच्या नियोजनावर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. वाहनधारकांची अपेक्षा आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरक्षित करावेत आणि खाजगी बांधकामाद्वारे रस्ता बंद होऊ नये याची योग्य ती पावले उचलावीत.




















