जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२५
यावल तालुक्यातील न्हावी गावाजवळील चावदस नगर जवळील तोला नाक्याजवळ ७ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास चक्कर येवून ट्रॅक्टरवरुन पडून झालेल्या दुर्दैवी घटनेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि, फैजपूर येथील कासार गल्लीतील आदित्य तुळशीराम काठोके असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मृताच्या काका विलास बळीराम काठोके यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, आदित्य काठोडे हा आपल्या मित्रासोबत न्हावी येथून ट्रॅक्टरवरून येत होता. त्याने मला चक्कर येत असून त्याने अचानक वाहन थांबवण्यास सांगितले. त्यानंतर अचानक त्याचा तोल जाऊन तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. रस्त्यावर पडल्यानंतर त्याला गंभीर इजा झाली.
त्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी डॉ खाचणे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार देवीदास सूरदास यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या अचानक झालेल्या घटनेमुळे काठोके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.