जळगाव मिरर | १४ जुलै २०२३
जळगाव शहरातील आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला शौचासाठी गेलेल्या एका युवकाला रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९:३० वाजता घडली. भावेश मुरलीधर सोनार (वय २८) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठलनगर भागात भावेश सोनार हा युवक आपल्या आई, वडील व मोठ्या भावासह वास्तव्याला होता. बुधवारी रात्री घरी आल्यानंतर ९:०० वाजेच्या सुमारास घरातून शौचासाठी निघाला. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकलगत रेल्वेचा धक्का लागल्याने भावेशचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या काही युवकांनी रात्री पोलिसांना दिली. हरिविठ्ठल नगरातील काही युवकांनी मृतदेह पाहिल्यानंतर भावेशची ओळख पटली. त्यानंतर ही माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली. गुरुवारी सकाळी भावेशचे विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. भावेश हा अनेक वर्षांपासून दुसऱ्याकडे वेल्डिंगचे काम करत होता. आठवडाभरापूर्वीच मोठा भाऊ कार्तिकसोबत त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता.