जळगाव मिरर | १ जुलै २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नाशिक-संभाजीनगर महामार्गावरील नागापूर फाटा (ता.निफाड) येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत चांदोरी येथील सातवीतील शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर याच डंपरने पुढे जात दुचाकीला धडक दिल्याने दाम्पत्य गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि. 30) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सिद्धी मंगेश लुंगसे (१२, रा. चांदोरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सोमवारी (दि. 30) सकाळी दहाच्या सुमारास सिद्धी मंगेश लुंगसे ही इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थिनी न्यू इंग्लिश स्कूल येथे सायकलवर जात असताना नागापूर फाट्याजवळ दुभाजकाच्या मध्ये रस्ता ओलांडण्यासाठी सायकलसह उभी असताना नाशिककडून निफाडकडे जाणाऱ्या भरधाव डंपर (क्र. एम.एच. जे. डब्लू. 4446) सिद्धी हीस जोरदार धडक दिली. यात सिद्धी जोरदार फेकली गेली. यात तिला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पुढे काही अंतरावर याच डंपरने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला पाठीमागून धडक दिली.
यात विश्वनाथ जाधव (55) व त्यांची पत्नी पद्मा जाधव (49) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी हलविले आहे. दरम्यान, सदरचे डंपरमधून राखेची वाहतूक केली जात असल्याचे घटनास्थळावर पडलेल्या राखेवरून दिसत आहे. अपघातसमयी डंपरचा वेग इतका होता की, विद्यार्थीस धडक दिल्यानंतरही पुढे जाऊन चालक वेग नियंत्रित करू शकला नाही. त्यामुळे पुढे दुचाकीला धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
