जळगाव मिरर | १२ मे २०२४
पारोळा शहरातील हरिनाथ टेन्ट हाऊसचे संचालकांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना १० रोजी रात्री ९. ५० वाजेच्या सुमारास नवीन महामार्गाच्या वळण रस्त्यालगत घडली. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांसह मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डी. डी. नगरमध्ये रहिवासी व हरिनाथ टेन्ट हाऊसचे संचालक अरुण रामभाऊ पाटील (वय ५५) हे १० रोजी रात्री ९.५० वाजता आपली अॅक्टिवा मोपेड (एमएच- १९, बीडब्ल्यू – ६४१९) ने पारोळा शहराबाहेरील बायपासवरून शेतातून घरी येत होते. या वेळी आयशर ट्रक (एमएच- १८, एए ८८०३) ने अरुण पाटील यांच्या मोपेडला मागून जबर धडक दिली. यातच ट्रकचे टायर अरुण पाटील यांच्या पोटावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच नातेवाईकांसह शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अरुण पाटील यांना उपचारासाठी कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत दौलतराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन पारोळा पोलिसात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते करत आहेत. दरम्यान, अरुण पाटील यांच्या अपघाताची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच त्यांचे मित्र, परिवार, नातेवाईकांसह आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, डॉ. शांताराम पाटील व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेळावे येथील ग्रामस्थ व मित्र परिवाराने गर्दी केली होती.
अरुण पाटील यांनी शून्यातून आपले विश्व तयार केला होते. आपल्या मेहनतीवर त्यांनी मंडपाचा व्यवसाय सुरू केला अन् त्यात ते यशस्वी झाले होते. त्यांना मुलगी, मुलगा आहे. त्यांनी मुलीचे योग्य ठिकाणी लग्न लावून मुलगा दीपक यास डॉक्टर बनवले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,
