
जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२५
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी लोहारा गावातून जळगावकडे येत असलेल्या रिक्षाला कुसुंबाजवळ ट्रॅव्हल्सने धडक दिली. धडक दिल्यानंतर रिक्षात बसलेल्या रत्नाबाई गणेश हिवाये (वय ४०, रा.लोहारा, पाचोरा) या दिशादर्शक फलकावर आदल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता कु सुंबा येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील रत्नाबाई हिवाये या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावातून भाजीपाला खरेदी करुन, त्या लोहारा येथे भाजीपाला विक्री करत. मंगळवारी नेहमीप्रमाणे त्या गावातील रिक्षातून जळगाव बाजार समितीकडे येत होत्या. कुसुंबा गावाच्या पुढे एका ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिलेल्या धडकेत, रिक्षा पलटी झाली. त्यानंतर रिक्षातून रत्नाबाई या दुर फेकल्या गेल्या. त्या थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशा दर्शक फलकाला जावून आदळल्या. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचालक बापू भास्कर चौधरी (वय ३०, रा.लोहारा) व गणेश बाबूलाल जाधव (वय २८, रा. रोटवद तांडा) हे दोन जण जखमी झाले. दोघांवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोहारा येथील रिक्षेला धडक बसल्यानंतर अपघाताच्या वेळेस लोहारा येथील युवक मोटारसायकलने जळगावला येत होते. गावातीलच्च रिक्षेचा अपघात झाल्यामुळे त्यांनी लागलीच गावात अपघाताची माहिती कळवली.