जळगाव मिरर | २० जानेवारी २०२५
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांची नुकतीच पालकमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा असतांना आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला आहे.
रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शनं केली. तसेच नाशिकमध्येही पालकमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. दादा भुसे यांना डावलून भाजपचे संकटमोचक गिरीश महजान यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत.
भरत गोगावले यांच्याप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळाले नाही. दादा भुसे यांना पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्रीपद हवे होते. पण नावं जाहीर झाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्रीपद हे जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. त्यामुळे दादा भुसेही नाराज झालेत. त्यामुळे आता रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.