जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील दौरे करीत सभा देखील करीत आहे. त्यांनी सरकारला दिलेली वेळ आता संपत येत असता ते पुढे काय निर्णय घेतील याकडे राज्यातील समाजबांधवांचे लक्ष लागून असतांना त्यांनी आता मंत्री भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, माझ्या नादी लागू नये, अन्यथा उरलेले केसही गळतील असे वक्तव्य त्यांनी कालच नाव न घेता छगन भुजबळ यांना उद्देशून केले होते. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्याच शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. “जो कोणी बोलला असेल त्याला म्हणावं, तू काय मी फार मोठे-मोठे लोक अंगावर घेतले आहेत. तू किस झाड की पत्ती है!” असं रोखठोक उत्तर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे. या दोघांमधील तू-तू, मै-मै अद्याप संपलेली नसल्याचेच यावरुन स्पष्ट होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे हा गुन्हा आहे. त्याला एक महिना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सरकारला देण्यात आलेल्या इशाऱ्यावर देखील भुजबळांनी टीका केली. या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.