जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
रावेर तालुक्यातील वाघोड फाटा रस्त्यावर पायी जाणाऱ्या महिलेला खिरवड रस्ता विचारण्याचा बहाणा करून डोळ्यात माती फेकत सोन्याची पोत लुटणाऱ्या दोन भामट्यांना रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले. अंतुर्ली शिवारात सापळा रचून दोघांना पकडण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोड गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी रावेर शहरात रेकी करत असल्याचे उघड झाले. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) शिवारात सापळा रचून अजय गजानन बेलदार (२०) आणि नरेंद्र उर्फ नीलेश अशोक बेलदार (२०, दोन्ही रा. अंतुर्ली) या आरोपींना नाट्यमय पाठलाग करत अटक केली.
दोघांनी या गुन्ह्याची कबुली देताना ३ नोव्हेंबर रोजी कुन्हा काकोडा बसथांब्याजवळ एका महिलेकडून १० ग्रॅम सोन्याची पोत लुटल्याचेही मान्य केले आहे. त्यांच्या ताब्यातून ७५ हजारांची मोटारसायकल आणि १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम सोने असा एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात सायबर क्राइमचे कॉ. मिलिंद जाधव व गौरव पाटील यांनी सहकार्य केले असून पुढील तपास फौजदार तुषार पाटील करीत आहेत.




















