जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२५
राज्यात आगामी स्थानिक निवडणुकीसाठी सर्वांनी आपआपल्या पद्धतीने तयारी सुरु केली असताना आता कालच मनसेच्या वतीने आयोजित दीपोउत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्धघाटन उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांंनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही, पण ठाकरे फॅमिली पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी दिपावळीच्या शुभेच्छा दिल्या. आज माध्यमांशी संवाद साधताना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.
ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार आहेत, अशी मोठी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दोन ठाकरे आहेत. दोन ठाकरे सब पे भारी. यावर चर्चा होत राहील. हा सोबत आहे का? तो सोबत आहे का? पण या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या, असा थेट इशारा त्यांनी दिला. जेव्हा दोन भाऊ एकत्र येणार तेव्हा आमची ताकद दिसेल, असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
भाजपाच्या अब की बार ७० ला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत दोन भावांचं अब की बार ७५ पार असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र लढण्याचे रणशिंग संजय राऊतांनी फुंगले आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असे वक्तव्य केले होते.
या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी मनसेचा प्रस्ताव दिलेलाच नाही. त्यांची वर्किंग कमिटी असते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीचा तो पक्ष आहे. तो अजूनही तसाचं आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी केलेल्या घोषणेवर मनसे काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे. पण राऊतांनी केलेल्या घोषणेमुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.