
जळगाव मिरर | ५ मार्च २०२६
गेल्या काही दिवसापूर्वी शहरात दोन महत्त्वाच्या उड्डाण पुल सुरु झाले असून या पुलांना राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर नामकरण करण्याची मागणी प्रभाग क्र. १ च्या नगरसेविका रिटा विनोद सपकाळे यांनीं महापौर दीपमाला काळे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर जवळील पुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुल तर रिंग रोडवरून कानळदा रोडकडे जाणारा उड्डाण पुल – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुल सदर नामकरणाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी, 14 एप्रिल 2026 रोजी करण्यात येईल, असे निवेदनात नमूद आहे. या निर्णयामुळे जळगाव शहराची शहरी शोभा वाढेल आणि नागरिकांना इतिहास व राष्ट्रप्रेमाची जाणीव होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर पुलांचे नामकरण हा शहरासाठी गौरवाचा प्रसंग मानला जात आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकल्पाची माहिती सार्वजनिक केली असून, नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. निवेदन देते वेळी विनोद(पिंटू)सपकाळे, नितीन लढ्ढा, सुरेश सोनवणे, संदीप ढंडोरे,जाकीर पठाण, रितिक ढेकळे, विजय बांदल उपस्थित होते.
महापौरांनी दिला शब्द !
येत्या महासभेत हा विषय चर्चेत घेतला जावून यावर तत्काळ निर्णय घेण्यात येणार असल्याचा शब्द मनपा महापौर दीपमाला काळे यांनी नगरसेविका रिटा सपकाळे यांना दिला आहे.




















