जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४
रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने आदल्या दिवशी हटकल्याचा राग आल्याने तिघांनी दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याने एक जखमी झाला असून एक बचावला आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिस अधिकारी कुलभूषणसिंह चौहान यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ शिंदे नावाच्या एका पायाने दिव्यांग असलेल्या रिक्षा चालकाला ५ रोजी रेल्वे अभियंत्याने कट मारला, असा आरोप करत त्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात रिक्षावाला गोंधळ घालायला गेला होता. त्यावेळी त्या अभियंत्याने तत्काळ रेल्वे सुरक्षाबलाच्या कर्मचाऱ्याला बोलावले. हरेंद्र कुमार या कर्मचाऱ्याने तेथे पोहोचल्यावर रिक्षा चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने हरेंद्र कुमार यास त्याने धमकी दिली. दरम्यान, ६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जीआरपी कार्यालयासमोर राहुल पाटील उर्फ रामजाने व शुभम पाटील उर्फ बंम आणि शिंदे या तिघांनी एकत्र येऊन हरेंद्र कुमार यांच्यावर चाकूने वार केला. हरेंद्र कुमार याने तो वार हातावर अडवण्याचा प्रयत्न केला असता अंगठ्याजवळ हाताला जखम झाली. तर हात ही फॅक्चर झाला. तर अर्जुनसिंग या आरपीएफ कर्मचाऱ्याच्या पोटात् चाकू मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र गणवेशाच्या पट्टयामुळे पोटात चाकू गेला नाही, अन्यथा अनर्थ घडला असता. दरम्यान, या आरोपींच्या मागे रेल्वे पोलीस धावले. शहरातील एका ठिकाणी नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला.
या प्रकरणी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपींना जीआरपीच्या ताब्यात देऊन नंदुरबार येथे नेले जाणार आहेत. तर जखमी हरेंद्र कुमार यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.