
जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२
औरंगाबाद जवळील वाळूज एमआयडीसीत नियमितणे सकाळची पहिली शिफ्ट सुरू होण्याची घाई असल्याने कंपनीत जाण्यासाठी कामगारांची लगबग सुरू होती. त्याच वेळेत एनआरबी बेअरिंग कंपनीच्या समोरील चौकात भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाल्याची घटना आज २४ रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी येथे घडली. यामध्ये दुचाकीवरील दोन बहिणी व एका भावाचा जागीच मृत्यू झाला.
रांजणगाव येथील दिपक लोखंडे (वय 20), अनिता लोखंडे (वय 22) आणि निकिता लोखंडे ( वय 18), अशी मृतांची नावे आहेत. दिपकही आपल्या बहिणीला येथील रेणुका ऑटो कंपनीत सोडण्यासाठी जात होता. याच दरम्यान भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे दुचाकी चालक दिपक लोखंडे आणि मागे बसलेल्या त्याच्या दोन बहिणी असे तिघेही ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच गतप्राण झाले, अशी माहिती अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या मनोज जैन यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना रुग्णाहिकेतून घाटी रुग्णालयात हलवले.




















