जळगाव मिरर | ३० जुलै २०२५
यावल तालुक्यातील साकळी गावाजवळील अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपड्याकडून यावलकडे येणाऱ्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात ४५ वर्षीय प्रौढ ठार झाला. तर समोरील दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, चोपड्याकडून यावलकडे दुचाकी (एमएच-१९, इबी- ५४४२) ने वेढोदे येथील राजेंद्र रमेश सपकाळे (कोळी, वय ४५) हे येत होते. दरम्यान, साकळी गावाजवळील रामजी जिनिंगच्या पुढील वळणावर यावलकडून चोपड्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी (एमएच १९, इएल ७७५३) ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात रमेश सपकाळे हे ठार झाले. तर समोरील दुचाकीस्वार विकास प्रकाश पवार (रा. साळशिंगी, ता. बोदवड) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी संदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दुचाकीचालक विकास पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करत आहेत
