जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२५
प्रयागराज येथे जगभरातील भाविक महाकुंभात सहभागी होण्यासाठी येत असतांना राज्यातील रत्नागिरी येथील भाविक देखील महाकुंभात सहभागी होण्यासाठी गेले होते तर घरी परतत असतांना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. 1) पहाटे घडली. या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत.
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातून घरी परतणाऱ्या रत्नागिरीच्या भाविकांच्या कारला पहाटे साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. त्यात तीन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. पहाटे पावणेतीनच्या दरम्यान झालेल्या दुसऱ्या अपघातात राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील महिला ठार झाली, तर तीन जण जखमी झाले आहेत.
शनिवारी (दि.1) पहाटे समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुका हद्दीत हा अपघात घडला. मराठवाडा, रत्नागिरी येथील भाविक प्रयागराज तीर्थ येथे महाकुंभमेळ्यासाठी गेले होते. शुक्रवारी (दि.31) रात्री ते नागपूर येथून समृद्धी महामार्गाने इगतपुरीकडे कार (एमएच 08 बीई 6006) ने येत असताना सिन्नर तालुक्यातील वावीजवळील मलढोण शिवारात महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या अज्ञात वाहनावर त्यांची कार धडकली.
या अपघातात प्रताप सावंत देसाई (69), अथर्व किरण निकम (24), भाग्यवान झगडे (50) रा. मराठवाडी, रत्नागिरी हे ठार झाले, तर प्रांजल प्रकाश साळवे (24), किरण वसंत निकम (58), रमाकांत पांचाळ (60) व संतोष रेडिज (60) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाचे सुरक्षा अधिकारी मिलिंद सरवदे यांच्या पथकाने व महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिर्डी येथील बचाव पथकातील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने सिन्नरच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
याच महामार्गावर सिन्नरजवळील सोनारी शिवारात पहाटे पावणेतीनच्या सुमारास दुसरा अपघात झाला. सोनारी शिवारात महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक (एमपी 20 जीए 6777)वर इगतपुरीकडून शिर्डीच्या दिशेने जाणारी कार (एमएच 17 सीएक्स 7495) धडकली.
या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील मंदा भाऊसाहेब भाटे (49) ही महिला जागीच ठार झाली तर अमोल भाऊसाहेब भाटे (30), स्विडल अमोल भाटे (49) व सोनल अमोल भाटे (2) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.