
जळगाव मिरर | २ एप्रिल २०२६
फळ विक्री करुन घराकडे निघालेल्या समाधान बापू भोई (वय ३२, रा. भालगाव, ता. एरंडोल) या तरुणाच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. दुचकीस्वार हा रस्त्यावर कोसल्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीवर आदळून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खेडीगावाजवळील महामार्गावर घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील भालगाव येथील समाधान भोई यांचा फळविक्रीचा व्यवसाय असून त्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. दुचाकीने ते भुसावळकडून गावी जाण्यासाठी निघाले. यावेळी खेडी गावाजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते खाली कोसळले व रिक्षाच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना पुन्हा धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ. नरेंद्र मोरे हे घटनास्थळी पोहचले. नागरिकांच्या मदतीने तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळाहून निघून गेले. समाधान भोई यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.





















