जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२५
यावल नगरपालिकेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नकार देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी केले आहे. भाजपच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा सुमारे पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.
यावल नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र विविध कारणांमुळे मतमोजणीला तब्बल १९ दिवसांचा विलंब झाला. अखेर रविवारी यावल तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यात आली.
निकालानुसार उबाठा गटाच्या छाया अतुल पाटील यांनी एकूण १४ हजार ५० मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. तर भाजपच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांना त्यापेक्षा सुमारे पाच हजारांहून कमी मते मिळाली. या मोठ्या मताधिक्यामुळे यावलच्या राजकारणात भाजपचा प्रभाव फिका पडल्याचे स्पष्ट झाले असून आमदार अमोल जावळे यांचाही प्रभाव मतदारांवर दिसून आला नाही.
विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या छाया पाटील यांचे पती अतुल पाटील यांनाही प्रभाग क्रमांक ११ मधून पराभवाला सामोरे जावे लागले. या प्रभागातून हेमराज फडे हे सुमारे २०० मतांनी विजयी झाले आहेत.
विजयाची अधिकृत घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांनी जल्लोष केला. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणाबाजी करत उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावल शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.
या निकालामुळे यावल नगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलली असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून छाया अतुल पाटील यांच्यावर आता शहराच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी आहे.




















