
जळगाव मिरर । २८ नोव्हेबर २०२२
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यादरम्यान प्रवक्त्याच्या वक्तव्यानंतर भाजपकडून शिवरायांचा अपमान झाल्याचं नाकारण्यात आलं होतं. दरम्यान आज या प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली, यादरम्यान ते भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
राज्यपालांना पदमुक्त केलं गेलं नाही तर तुमच्या खासदारकीचा राजीनामा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ती त्या वेळची गोष्ट आहे, काय होईल काय नाही होणार ते पाहून मी त्यावेळी निर्णय घेईल. माझी भूमिका मी बदलत नाही. कुठल्याही राजकारणासाठी मी त्यापासून फारकत घेणार नाही, असे उदयनराजे यावेळी म्हणाले. तसेच, तीन डिसेंबर रोजी राडगडावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देखील उदयनराजे यांनी यावेळी दिली. रायगडावर जाऊन लोकांच्या भावना व्यक्त करणार असे ते म्हणाले आहेत.
तुमच्या डोळ्यात आता अश्रू आले होते, ही तुमची हतबलता समजायची का, की तुम्ही अश्रु गाळता असा प्रश्न उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, तसं समजा.. माझा उलटं तुम्हाला प्रश्न आहे, भावना फक्त तुम्हाला दिल्या आहेत का? आम्हाला नाहीयेत का? हे काय मगरीचे अश्रू होते का? असे उदयनराजे यावेळी म्हणाले. फडणवीस राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांचं समर्थन करतात यावर प्रतिक्रिया विचारली असता, उदयनराजे म्हणाले की, मी जे बोलायचं होतं ते बोललो. त्यांचं समर्थन मी तरी केलं नाही. कुठला पक्ष या लोकांविरोधात भूमिका घेत नसेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊच नका, असेही उदयनराजे म्हणाले.





















