
जळगाव मिरर | २५ मार्च २०२६
जळगाव तालुक्यातील उमाळा–गाडेगाव परिसरात बुधवारी (दि. २५ मार्च) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फर अली सय्यद बबन (वय ६०) आणि ताहेराबी मुझफ्फर अली (वय ५५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. मुझफ्फर अली हे मसाला विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी त्यांच्या चुलत भावाच्या मुलीच्या लग्नानिमित्त हे दाम्पत्य दुचाकी (एमएच १९ ईजे ३८९८) वरून जळगावहून फर्दापूर येथे गेले होते. लग्न समारंभ आटोपून सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या दरम्यान ते परत जळगावकडे निघाले असता उमाळा ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्यात आलेली नव्हती. अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुल आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.





















