जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२५
बेंगळुरूमध्ये पत्नीने जीवन संपवल्याच्या धक्क्यातून सावरत नसतानाच नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली. शहरातील एका हॉटेलमध्ये माय-लेकाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, आईची प्रकृती चिंताजनक आहे.
मूळचे बेंगळुरू येथील रहिवासी असलेले जयंती आणि त्यांचा मुलगा सुरज काही दिवसांपूर्वी नागपुरात आले होते. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल रॉयल व्हिला (हॉटेल लिजेड इनच्या मागे) येथे त्यांनी मुक्काम केला होता. मात्र, याच ठिकाणी दोघांनी विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले. यामध्ये सुरजचा मृत्यू झाला, तर जयंती यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमागे कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावाची पार्श्वभूमी आहे. सुरजचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र गुरुवारी (दि. २५) त्याच्या पत्नीने बेंगळुरूमधील राहत्या घरी जीवन संपवले. या घटनेनंतर पत्नीच्या नातेवाईकांनी सुरज व त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात बेंगळुरूतील पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलनही करण्यात आले होते. पत्नीच्या मृत्यूनंतर सुरू झालेली पोलिस कारवाई, नातेवाईकांचे आरोप आणि सामाजिक दबाव यामुळे सुरज व त्याची आई तीव्र मानसिक तणावाखाली होते. याच विवंचनेतून त्यांनी नागपूर गाठले आणि हॉटेलमध्ये हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागपूर पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.





















