जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५
तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळीची सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर पोलिसांनी कडक सुरक्षेत गवळी यांना मागील गेटने तुरुंगाबाहेर काढले.
गवळी २००७ मध्ये मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मागील १८ वर्षांपासून तो जामिनासाठी प्रयत्न करत होता. आज सुटका झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आणले, जिथून ते मुंबईकडे रवाना झाले.
मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये ‘डॅडी’ नावाने कुप्रसिद्ध असलेले अरुण गवळी हे भायखळ्याच्या चिंचपोकळीतील दगडी चाळीत वाढले. सुरुवातीला छोट्या गुन्ह्यांतून कारकीर्द सुरू करून त्यांनी स्वतःचा गँग स्थापन केला आणि हळूहळू दाऊद इब्राहिमविरोधी गटाचे नेतृत्व हातात घेतले. केवळ गँगवॉरपुरतेच न थांबता गवळींनी पुढे राजकारणात प्रवेश केला. स्वतःची ‘अखिल भारतीय सेना’ ही संघटना स्थापन केली आणि मुंबईतील निवडणुकांत आपली ताकद दाखवून एकेकाळी विधानसभेत आमदार पद मिळवले.