
जळगाव मिरर | ५ मार्च २०२६
चाळीसगाव येथील रेल्वे उड्डाणपुलावर स्कूटरला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत स्कूटरस्वार खडकी येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खडकी बुद्रुक की बुद्रुक येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन अशोक ठुबे (वय ३७) हे ३ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या होंडा अॅक्टिवा (एमएच- १९, बीएस ८२४०) या दुचाकीने घराकडे निघाले होते. दरम्यान, शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, अपघात होताच धडक देणारे संबंधित वाहनचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, पोलीस घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. सचिन ठुबे हे सामाजिक कार्यात सक्रिय होते. त्यांच्या दुर्दैवी आकस्मात निधनामुळे खडकी बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




















