जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२५
दहा वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. ही घटना दि. ७ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तपासचक्रे फिरवित अपरहण झालेल्या बालकाचा शोध घेत संशयित आरोपी योगेश अनार शेमळ्या (वय २०, रा. भोरस बु., मूळ रा. जामन्या, जि. बडवाणी, म.प्र.) याला अटक केली.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून दहा वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दि. ८ रोजी पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी दोन वेगवेगळी पथके तयार केली. एक पथक मध्य प्रदेशातील सेंधवा येथे, तर दुसरे जळगाव जिल्ह्यात तपासासाठी रवाना झाले. पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयित योगेश शेमळ्या याला मेहूणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचगव्हाण फाटा येथून मुलासह ताब्यात घेतले. त्या बालकाची चौकशी केली असता, त्या संशयिताने बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर गुन्ह्यात पोक्सो कायद्याअंतर्गत कलमे वाढवण्यात आली असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.उपनि. प्रदीप शेवाळे करीत आहेत.
