जळगाव मिरर | २ मार्च २०२४
राज्यातील बदलत्या हवामानामुळे खान्देशला अवकाळी पावसाने शुक्रवारी चांगलेच झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका देखील बसला असून वादळी वाऱ्यामुळे शिरपूर तालुक्यात केळी बागांचे मोठे नुकसान झाले. नंदुरबारला तापी पट्टयातही पावसाचा तडाखा बसला.
तेथील गहू, हरभरा व दादर पिकांचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, चोपडा आणि यावल तालुक्यात वादळी वाऱ्याने आठवड्यात तिसऱ्यांदा हजेरी लावत शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी होत आहे.
शिरपूर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे केळी बागांसह ज्वारी, मका पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाचा सर्वाधिक फटका अर्थ बुदूक, बलकुवे या भागात बसलेला आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. वादळामुळे काही ठिकाणी तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.