जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२४
देश आणि राज्य आज कठीण परिस्थितीतून जात आहे. ही परिस्थिती बदलायची आहे. छत्रपती न शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे येथे रयतेचे राज्य स्थापन केले, व त्याचप्रमाणे आपल्याला जनतेचे राज्य आणायचे आहे. त्यासाठी न संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा ही ‘तुतारी’ देईल, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी किल्ले रायगड येथे बोलताना काढले. पक्षाच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर निवडणूक चिन्हाची प्रतिकृती ठेवून शरद पवार यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, खा. फौजिया खान, आ. जितेंद्र आव्हाड, आ. अनिल देशमुख, सुमन पाटील, विद्या चव्हाण, तसेच प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. वयोमानामुळे रायगड किल्ल्यावर जाणे अवघड असल्याने ८३ वर्षीय शरद पवार यांनी प्रथम तेथील रज्जूमार्ग आणि नंतर पालखीचा आधार घेतला. त्यानंतर राजसदरेवर ‘तुतारी’चे मोठ्या थाटात अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सध्याच्या देशस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ‘ही तुतारी संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे,’ असे सांगून ते म्हणाले की, या प्रेरणेतूनच सर्वसामान्य जनतेसाठी ही आनंदाची तुतारी ठरणार आहे. देश आणि राज्य सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार सामान्य माणसाचे हित जपण्याचे कोणतेही काम करत नाही. सर्वसामान्यांना सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नाही. सर्वसामान्य जनतेला पुन्हा आनंदाचे दिवस आणण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे येथे रयतेचे राज्य आणले, तसे आपल्याला जनतेचे राज्य आणायचे आहे. त्यासाठी कष्ट आणि त्याग करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.