जळगाव मिरर / २३ नोव्हेंबर २०२२
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपली विशेष छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्याचे कळतंय. त्यांचे वय सध्या ८२ वर्षाचे आहे.
विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्यासह जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे हे कलाकार दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून सुटी मिळताच त्यांनी गोदावरी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पावती मिळाला आहे. अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते. यापूर्वी अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ते या मालिकेत दिसले होते.
