जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीवर आघात करणाऱ्या अनेक बातमी समोर येत असतांना आज देखील अशीच एक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून रविंद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यांवर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी पहाटे त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. दोघांनीही बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
रविंद्र बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली होती. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक,हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले. याशिवाय बेर्डे यांनी हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला होता. अशा दिग्गज कलाकाराचं अचानक निधन झाल्याने सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांना १९९५ मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर २०११ पासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते.