जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२४
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चौगाव बुद्रुक येथील ग्रामसेविकेला १५ हजारांची लाच घेताना सोमवारी त्यांच्या घरी ताब्यात घेण्यात आले. राजबाई पाटील असे या ग्रामसेविकेचे नाव आहे. राजबाई पाटील यांना सुमारे ६० हजार रुपये वेतन आहे. शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चौगाव बुद्रूक येथे १५ व्या वित्त आयोगातून पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम झाले. या कामाचे बिल कंत्राटदाराला मिळाले. त्यानंतर कंत्राटदाराने गावातील रस्त्याचे काम केले. या कामाचे बिल मिळाले नव्हते. या बिलासाठी संबंधिताने ग्रामसेविका राजबाई पाटील यांची एक महिन्यापूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी पेव्हर ब्लॉकच्या अदा झालेल्या कामाचे व रस्ता कामाचे बिल अदा करण्यासाठी २५ हजारांची मागणी झाली. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ४ एप्रिलला तक्रार केली होती. या तक्रारीची त्याच दिवशी पडताळणी झाली.
तडजोडी अंती २५ हजारांऐवजी १५ हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेची रक्कम ग्रामसेविका पाटील यांनी घरी आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार शिंदखेडा येथील त्यांच्या घरी लाच स्वीकारताना श्रीमती पाटील यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकातील निरीक्षक हेमंत बेंडाळे, रूपाली खांडवी, कर्मचारी राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे आदींनी कारवाई केली. राजबाई पाटील ग्रामसेविका पाटील यांचे शिंदखेडा येथील साईराम नगरात घर आहे. कारवाईनंतर एकीकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुसरीकडे एक पथक उशिरापर्यंत त्यांच्या घराची झडती घेण्यात गुंतले होते.