जळगाव मिरर | ३० मार्च २०२५
रिक्षाच्या सीटखाली गावठी कट्टा, जिवंत काडतूस घेऊन जळगाव शहरात येत असलेल्या राहुल रंगराव पाटील (वय ३२, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी कट्टा व काडतूस जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात नाकाबंदी, पेट्रोलिंग करून गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यानुसार कुसुंबा येथील राहुल पाटील हा त्याच्या (एमएच १९, सीडब्ल्यू ६१०८) क्रमांकाच्या रिक्षामध्ये गावठी कट्टा घेऊन येत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या असता पोलिस नाईक किरण वानखेडे, पोकॉ विकी इंगळे, रवींद्र साबळे यांनी नेरी नाका परिसरात रिक्षाची तपासणी केली असता चालकाच्या सीटखाली देशी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतूस आढळून आले. गावठी कट्टा व जीवंत काडतूस जप्त करण्यासह चालकाला अटक करण्यात आले.