
जळगाव मिरर | २ जून २०२५
राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील काही नेत्यांसह कार्यकर्ते महायुतीकडे पक्ष प्रवेश सुरु असतांना आता महायुतीचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक विधान केल्याने राज्यातील ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पक्षात पुढील 8 दिवसांत मोठा भूकंप होईल. त्यानंतर त्या पक्षात कोण राहणार व कोण राहणार नाही हे स्पष्ट होईल, असे सूचक विधान मंत्री महाजन यांनी केले आहे.
गिरीश महाजन नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, संजय राऊत नाशिकमध्ये येऊन संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पण त्यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेही बेजार झाले असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. संजय राऊत एकटेच ठाकरे गट संपवण्यासाठी पुरेसे आहेत. त्याला इतरांची गरज लागणार नाही. त्यांची बडबड व विचार काय आहे ते नंतर पाहू. तूर्त निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू. नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. पुढे काय होते ते आठवड्याभरात स्पष्ट होईल. 8 दिवस थांबा. पुढे काय होते ते पाहा. सगळे मोठ प्रवेश असतील. त्यात काही पक्ष अक्षरशः नेस्तनाबुत होतील, असे ते म्हणाले.
गिरीश महाजन यांनी यावेळी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाष्य करातना आपण कुंभमेळा मंत्री असून, आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याचे यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी त्यावर काही वेगळे बोलणार नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यासंदर्भात कामही जोरात सुरू आहे. कालच्या बैठकीसाठी केवळ मंत्री महोदयांना निमंत्रण होते. आमदार, खासदार यांना नव्हते. काही आमदार मुख्यमंत्री आल्यामुळे या कार्यक्रमाला आले. या बैठकीला 13 च्या 13 आखाड्यांचे महंत आले. असे पहिल्यांदाच घडले, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नाशिकमधील उपनेते सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा संबंध गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाशी जोडला जात आहे. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे स्थानिक राजकारणात याविषयी खमंग चर्चा सुरू झाली आहे. पण बडगुजर यांनी आपण आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्त्वाची बाब आहे. काही क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री व क्लास फोरचे प्रमोशन बाकी आहे. ते प्रमोशन लवकर व्हावे, यासंबंधीचे निवेदन देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माझ्या या भेटीची माहिती संजय राऊत यांच्यासह सर्वांना होती, असे सुधाकर बडगुजर यांनी याविषयी बोलताना सांगितले आहे.




















