
जळगाव मिरर | १२ मार्च २०२६
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता भारतातील उद्योग-व्यवसायांवर उमटू लागले असून, महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्यातील विविध भागांत गॅस मिळवण्यासाठी नागरिक तासंतास लांबच लांब रांगेत उभे असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. वितरणादरम्यान कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाला अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे.
मालेगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. पहाटेपासूनच वितरण केंद्रांवर लांब रांगा लागल्या होत्या. नागरिक गॅस उपलब्ध न होईल या भीतीने घाबरून गेले असले तरी महसूल प्रशासनाने स्पष्ट केले की प्रत्येकाला घरगुती गॅस मिळेल, त्यामुळे संयम राखावा.
नागपुरात भर उन्हातही नागरिक घरगुती गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहिले. प्रशासनाकडून तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. सिलिंडर वाहने नुकतीच आल्यामुळे पुरवठा सुरू झाला आहे; तरीही भविष्यात टंचाई निर्माण होईल या भीतीमुळे नागरिक ‘पॅनिक’ झाल्याचे चित्र आहे. वितरण प्रणालीतील तांत्रिक अडचणी हे गोंधळाचे मुख्य कारण असल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका भंडारा जिल्ह्यातील तांदूळ निर्यातीवर बसला आहे. या परिस्थितीमुळे भंडारा जिल्ह्यातील राईस मिलचे उत्पादन घटले असून, अनेक ठिकाणी कामगार कपात झाली आहे. परिणामी, अनेक कामगारांसमोर पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, जिल्ह्यातील संपूर्ण तांदूळ उद्योग संकटात सापडला आहे.
सातारा जिल्ह्यात प्रशासनाने गॅसचा मुबलक साठा असल्याचे स्पष्ट केले असले तरी, युद्धजन्य परिस्थितीमुळे टंचाई निर्माण होईल या भीतीने नागरिक गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावत आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील इंडेन एजन्सीबाहेर सकाळपासूनच प्रचंड गर्दी दिसून आली असून, येथे पुढील 10–12 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. दररोज 22 हजार सिलिंडरचे वितरण केले जात आहे, तरीही नागरिक भीतीमुळे झुंबड करत आहेत. कोल्हापूरमध्येही नागरिकांनी रांगा लावल्याचे दिसून आले आहे.





















