जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी अनेक आंदोलन केली होती आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 5 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार. तसेच 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले असे आरोप पुन्हा एकदा जरांगे यांनी केले आहेत.
प्रसार माध्यमांशी बोलतांना जरांगे म्हणाले, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. यंदाच्या निवडणुकीत आमची कोणतीही भूमिका नाही. कुठे उमेदवार दिलेला नाही आणि कोणाला पाठिंबाही दिला नाही. यंदाची निवडणूक समाजाच्या हातात आहे. त्यामुळे कोणाला पाडायचे हे समाज ठरवणार. पाडण्यात सुद्धा मोठा विजय आहे”, असे जरांगे म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ”महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ उद्या देऊ असे म्हणत आरक्षणाचे आश्वासन देऊन सात महिने झाले. महाविकास आघाडीमधील नेत्यांनीही चाळीस वर्षे आम्हला फसवले” असे जरांगे म्हणाले. तसेच मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. त्यांचे इतके प्रेम उफाळून येते की सांगता येत नाही असा टोलाही जरांगे यांनी लगावला.
त्याचबरोबर जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे”, अशी टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.